Ad will apear here
Next
‘आजच्या जगात प्रायव्हसी हा भ्रम आहे’


सध्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यावरून ‘डेटा प्रायव्हसी’चा विषय खूपच चर्चेत आला आहे. व्हॉट्सअॅप आपली कोणती माहिती गोळा करून इतरांना पुरवणार आहे? तर.. आपण कुठे आहोत ते ठिकाण, कम्प्युटरवरचा आयपी अॅड्रेस, वापरत असलेली आॉपरेटिंग सिस्टीम, आपल्या मोबाइलची बॅटरी लेव्हल, आपण वापरत असलेलं नेटवर्क (रिलायन्स / बीएसएसनएल इ.), भाषा, जगात ज्या स्थानिक प्रमाणवेळेत आहोत तो झोन, आपल्या मोबाइलचा IMEI क्रमांक (आपला मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला, तर या १५ आकडी नंबरवरून थांग लावता येतो), तसंच आपण मेसेज कोणते/कशा प्रकारचे पाठवतो, कोणाला फोन करतो, कोणत्या ग्रुपचे सभासद आहोत, आपलं स्टेटस, आपला प्रोफाइल फोटो, आपण ऑनलाइन कधी होतो.. 

माहिती पुरवण्यात आपण केलेली आॉनलाइन transactions and payments हा अजून एक प्रकार व्हॉट्सअॅपनं वाढवला आहे. कोणत्या अॅपवरून आपण पेमेंट्स केली इत्यादी माहिती त्यात येते. 

युरोपियन युनियन्समधले युजर्स सोडून इतर ठिकाणी व्हॉट्सअॅपच्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’मध्ये हे बदल घडण्याची शक्यता आहे. 

खरं तर आपली वैयक्तिक माहिती कम्प्युटरवर फारशी ‘सुरक्षित’ नाही हे ‘उघड गुपित’ आहे.

फेसबुक आधीच तुमच्याबद्दल कोणकोणती माहिती गोळा करतं? तर.. तुमचं पृथ्वीवरचं ठिकाण, वय, पिढी, लिंग, भाषा, शिक्षण, शिक्षणाचं क्षेत्र, शाळा, वंश, उत्पन्न, खर्च, कोणत्या प्रकारचं घर आहे त्याची माहिती, घराची किंमत, घराचा आकार, घराचं चौरस फुटातलं क्षेत्रफळ, तुमच्या मित्रयादीत पुढच्या ३० दिवसात किती जणांची अॅनिव्हर्सरी किंवा वाढदिवस आहे, किती जण कुटुंबापासून दुसऱ्या शहरात राहतात, कोणत्या मित्रांचं नवीन लग्न किंवा साखरपुडा झाला आहे, किती जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत, किती जणांना नुकतीच नोकरी मिळाली आहे, किती जणांनी नुकतंच घर बदललं आहे, पालकांचं वय किती आहे, तुम्हाला मूल होणार असेल तर कधी होणार आहे, राजकारणात किती जणांना रस आहे, किती जण अंतर्मुख किंवा बहिर्मुख स्वभावाचे आहेत, तुम्ही नोकरी कुठे करता, ते उद्योगाचं क्षेत्र कोणतं आहे, तुमचा हुद्दा, तुमचं आॉफिस कसं आहे, तुमच्या आवडीनिवडी, मोटारसायकल्स वापरायला किती जणांना आवडतं, कोण मोटारगाडी घ्यायचा विचार करतंय (किंमत /ब्रँड इ.), कोण गाडी दुरुस्तीला देणार आहे, किती वर्षांत गाडी बदलता, तुमच्या कंपनीतले किती जण मोटारगाड्या वापरतात, तुम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरता, गेम्स किती जण खेळतात, किती जण फेसबुकवर इव्हेंट्स तयार करतात, फेसबुकवरून जाहिराती करायला किती जण किती पैसे देतात, कोणता युझर कोणतं फेसबुक पेज अॅडमिनिस्टर करतो, कोण किती, कोणते फोटो अपलोड करतं, तुम्ही कोणता इंटरनेट ब्राउझर, ई-मेल्स, इतर अॅप्स वापरता, नवीन तंत्रज्ञान बाजारात आल्यावर किती दिवसांनी वापरता, तुम्ही कोणत्या देशात जन्माला आलात आणि आत्ता कुठे राहता, तुम्ही कोणत्या संघटनेत आहात, तुमच्याकडे किती क्रेडिट/डेबिट कार्डस् आहेत, ती तुम्ही किती वेळा वापरता, तुम्ही रेडिओ ऐकता का, कोणते टीव्ही कार्यक्रम बघता, कोणता मोबाइल वापरता, इंटरनेट कनेक्शन कोणतं वापरता, नुकताच स्मार्टफोन घेतला आहे का, इंटरनेट स्मार्टफोनवरून वापरता का, कोणत्या प्रकारचे कपडे घालता, सर्वांत जास्त खरेदी वर्षातून कधी करता, बिअर/वाइन किंवा इतर मद्य खूप जास्त प्रमाणात कोण विकत घेतं, जास्त किराणा सामान कोण घेतं, जास्त सौंदर्यप्रसाधनं कोण घेतं, कोणती औषधं कोण घेतं... इत्यादी.

२००७ साली मार्क झुकेरबर्ग सीईओ शोधत होता, त्या वेळी त्यानं इंजिनीअर किंवा तंत्रज्ञ शोधला नाही, तर जाहिरातक्षेत्रात करिअर केलेल्या शेरिल सँडबर्गला नियुक्त केलं, हे पुरेसं बोलकं आहे. 

‘१९८४’ या कादंबरीत जॉर्ज ऑर्वेलनं ‘माणसाचा प्रत्येक संवाद आणि प्रत्येक विचार यावर लक्ष ठेवलं जाईल’ असा इशारा दिला होता. याच कादंबरीतला बिग बॉस पुढे म्हणतो, ‘इतरांचं भलं कसं होईल याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला फक्त सत्ता मिळवण्यात आणि गाजवण्यात रस आहे!’

१९७७ साली सिडने शेल्डनच्या ब्लडलाइन या कादंबरीत एक प्रसंग होता. तो असा :

मॅक्सनं कम्प्युटरला आदेश दिला, ‘मला जरा अलेक निकोलसबद्दल सांग...’ समोरच्या कम्प्युटरनं माहिती पुरवायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये अलेकनं बॅंकेत किती पैसे भरले, त्याचे किती चेक कॅन्सल झाले, कोणत्या बिलांसाठी पैसे दिले, त्याच्याकडे एक बेंटली आणि एक मॉरिस मोटारगाडी आहे (पण सात वर्षांत एकही दुरुस्तीचं बिल नाही), एक चेक व्हाइट क्लबला दिलाय, दुसरा चेक साउथ आफ्रिकेतल्या स्त्रियांच्या कपड्यांच्या एका दुकानाला इव्हिनिंग गाउनसाठी दिलाय, एक डेंटिस्टला दिलाय, इव्हिनिंग गाउनसाठी परत एका दुकानाला चेक दिलाय, (या वेळी मात्र ते पॅरिसमधलं दुकान होतं), हेअरड्रेसर, घरातल्या नोकरांना दिलेले चेक... असं सगळं काही क्षणांमध्ये मॅक्सला कम्प्युटरनं सांगितलं.

मग मॅक्सनं कम्प्युटरला ऱ्हिस विल्यम्सबद्दल माहिती विचारली. क्षणार्धात ऱ्हिसचं जन्मसाल, जन्माचं ठिकाण, पगार, नोकरी करत असलेल्या कंपनीचं नाव, लंडनमधल्या सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स, झुरिकमधल्या एका सेफ्टी डिपॉझिट बॉक्सचा क्रमांक, क्रेडिट कार्डस् आणि किती खरेदी केली त्याची माहिती समोर आली.

शेल्डनच्या ब्लडलाइन या कादंबरीमध्ये मॅक्स हॉर्नंग हा डिटेक्टिव्ह ही माहिती कम्प्युटरवरून शोधून काढतो. या कादंबरीत शेल्डन म्हणतो, ‘आजच्या जगात प्रायव्हसी हा भ्रम आहे. प्रत्येक नागरिक हा कम्प्युटरसमोर उघडा पडलेला आहे.’

- नीलांबरी जोशी

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GVBTCU
Similar Posts
फेसबुकची मोहनिद्रा ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ इत्यादी ‘बुलेट ट्रेन्स’ भरधाव वेगाने पुढे जात आहेत. त्यांना शेवटचे स्टेशन नाही किंवा परतीचा प्रवास नाही. आपण त्यांच्यासह प्रवासात टिकून राहिले पाहिजे, किंवा वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर उतरले पाहिजे. चार फेब्रुवारी हा फेसबुकचा स्थापना दिवस. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘फेसबुकच्या मोहनिद्रे’बद्दल
ऑनलाईन मैत्री.. 👬👭👫 ''Hi...'' फेसबुक वॉल स्क्रोल करत असताना आभाच्या मेसेंजरवर हिरवा दिवा लुकलूकला. सहसा कोणाला रिप्लाय न करणाऱ्या आभाने त्या दिवशी मात्र का कोण जाणे त्याला पटकन रिप्लाय दिला. फेसबुकवर बोलता बोलता दोघांमधली मैत्री हळूहळू वाढत गेली आणि मग ‘व्हॉट्स अँपवर असशीलच तू…’ या थोड्याशा जुन्या झालेल्या नंबर मागायच्या
मी कॉपीराईटर आणि पत्रकार! सेक्स, बलात्कारापासून ते सामाजिक विषयांवर मी लिहित असून महाराष्ट्रातील आणि परदेशातील विविध ग्रुप्सने पसंती दिली आहे. अनेकांनी माझा व्यवसाय विचारला आहे.
अव्यक्त आपल्या सगळ्यांच्या मनात निरनिराळे विचार चालू असतात. काही मनाला आनंद देणारे तर काही दुःख देणारे. आपल्या मनात चाललेल्या निरनिराळ्या गोष्टी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करत असतो. असे काही मित्र-मैत्रिणी असतात ज्यांच्याशी आपण मागचा पुढचा विचार न करता अगदी बिनधासपणे बोलू शकतो...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language